०१ जुलै २०२४

हरितक्रांतीचे शिल्पकार : वसंतराव नाईक

ब्लॉगर पोस्ट कॉपी प्रतिबंध

 


श्री.अनंत देशमुख , कृषी पर्यवेक्षक 

अकोट जि. अकोला

राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांचा जन्म एक जुलै 1913 रोजी झाला. 1963 ते 1975 या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते. याच काळात आपल्या राज्यात दुष्काळाचे सावट होते. मुख्यमंत्री झाल्यापासूनच त्यांनी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी योगदान दिले.

          आधुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरद पवार यांनी घोषित केला. तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषी दिन साजरा होत आहे. 

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतीवर निस्सिम भक्ती असणारे नेते वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे की "मी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर देहाने जरी असलो तरी माझे चित्त मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर असते.' हा विचार लक्षात घेता शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व शेतकऱ्यांना आत्मबळ देण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत श्री एकनाथराव पवार यांनी कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव संकल्पना रुजवली. 2011 पासून कृषी दिन हा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करण्याची प्रथा रूढ झाली. इतर राज्यात देखील एक जुलैला कृषी दिन साजरा होताना दिसून येतो.

          कृषी दिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिन हा नैसर्गिक रित्या पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावन पर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनेचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखले जातात. भूमीहिनाना लाखो एकर जमीन त्यांनी वाटप केली. शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलविण्याचे  तसेच कृषी संस्कृतीला नव संजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केले. शिवाय पहिल्यांदाच चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली. 1972 सारख्या भीषण दुष्काळातही महानायक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी शेतकरी आत्महत्या शब्द देखील गवसला नव्हता. शेतकऱ्यांवर त्यांचे  जिवापाड प्रेम होते.

 शेती आणि मातीवरील त्यांची निश्‍चिम भक्ती ही भारतीय कृषी संस्कृतीच्या इतिहासात एक प्रेरणा म्हणून ओळखली जाते. शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांचे लेकरं सुद्धा कलेक्टर झाली पाहिजेत हे महानायक वसंतराव नाईक यांच्या स्वप्न होते. थेट बांधावर आधुनिक कृषी तंत्र व दूरगामी उपाय योजनांची अंमलबजावणी याबरोबरच नव्या पिढीत शेती, शेतकऱ्यांप्रती जिव्हाळा निर्माण केल्यास नाईक साहेबांची स्वप्न पूर्णत्वास येऊ शकते. भारतीय कृषी संस्कृतीला उजाळा देणाऱ्या कृषी दिन या पावन पर्वाचे जनमानसात अनन्यसाधारण असे महत्त्व असून शासकीय कार्यालय, गाव,शहरात अनेक ठिकाणी त्यांची जयंती साजरी केली जाते.

     कृषी विभाग दरवर्षी एक जुलैला महानायक वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करत असतो. या दिवशी गाव पातळीवर, तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.  त्या परिसरातील प्रगतिशील तसेच पुरस्कार प्राप्त शेतकरी  यांचा सन्मान केल्या जातो आणि त्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतात.

कृषि क्षेत्रासमोरील आव्हाने व संधी व कृषि क्षेत्रातील सकारात्मक बदल

v ब्लॉगर पोस्ट कॉपी प्रतिबंध

 


यशवंत आप्पासाहेब गव्हाणे

एम.  एस्सी ( ॲग्री)

 कृषि पर्यवेक्षक  सावंतवाडी

महाराष्ट्र शासन कृषि विभाग

भारत हा कृषि प्रधान देश आहेच . बहुतांश जनतेचे उपजीविकेच साधन व सर्व लोकांचे अन्नधान्य पुरवठा हा फक्त कृषि क्षेत्रातुनच होतो. कोव्हिड कालखंडात सर्व जगाने अनुभवले आहे की  आरोग्य वगळता इतर बहुतांश सर्व  क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले होते फक्त शेतकरी व कृषि उत्पादन व पुरवठा अविरतपणे चालु होता..





वाढत्या लोकसंख्येला  अन्नधान्य पुरवठा – 

देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे वाढत्या लोकसंखेस  पौष्टीक व सकस अन्नधान्य पुरवठा करणे अत्यंत महत्वाचे आहे.
उत्पादनक्षम शेतजमीनीवरील  वाढता ताण- वाढती लोकसंख्या व शहरीकरण  यामुळे शेतजमीनीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे सन 1951 साली प्रतिमाणसी पिकाखालील क्षेत्र 47 गुंठे होते 2001 साली हे 15 गुंठयावर आले तर 2033 साली हेच क्षेत्र फक्त 8 गुंठयावर येणार आहे हे आव्हान पेलताना कृषि क्षेत्रात विविध प्रकारचे बरेच सकारात्मक बदल होताना दिसत आहेत ते कोणते ते आपण या लेखामध्ये जाणून घेऊया


जमिनीचे आरोग्य सुधारणा-


गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राचे प्रत्येक महसुली गावातील माती नमुने काढून सदर गावाची आरोग्य पत्रिका तयार केली आहे व हे आरोग्य पत्रिका गावांमध्ये प्रसारित केली आहे या आधारे शेतकऱ्यांना आपल्या पिकानुसार किती खत द्यावे याबद्दल माहिती मिळत आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांमधून वैयक्तिक शेतकऱ्यांना माती परीक्षण करून मोफत आरोग्य पत्रिका वितरित केली जात आहे. 


यामुळे खताचा गरजेनुसार, सुयोग वापर होत आहे .अनावश्यक खत वापर व खतावरील होणारा खर्च टाळला जात आहे. मुख्य अन्नद्रव्या बरोबरच दुय्यम अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य वापराबद्दल शेतकऱ्यांमध्ये जाग्रृती केली जात आहे व वापराबाबत  माहिती दिली जात आहे व त्याचा वापर होत आहे. जमिनीच्या आरोग्य सुधारण्यामध्ये रासायनिक खताबरोबरच विविध प्रकारची सेंद्रिय हिरवळीचे खते जैविक खते यांचाही वापर वाढलेला आहे यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढत आहे.


सुधारित तंत्रज्ञान


 गेल्या काही वर्षांमध्ये  तंत्रज्ञानामध्ये अमुलाग्र बदल झालेला आहेव  संशोधन झालेले आहे यामध्ये प्रामुख्याने ड्रोन चा वापर सुदूर संवेदन प्रणालीचा वापर याद्वारे की रोग सर्वेक्षण व पिकावर फवारणी यासाठी केला जात आहे तसेच पीक तंत्रज्ञानामध्ये सेंसर च्या वापरामुळे पिकाला आवश्यक असणारे पाणी अन्नद्रव्य यांचा पुरवठा गरजेनुसारच होत आहे व हे काम सोपे झाले आहे.


पाणी व्यवस्थापन- 

पाणी व्यवस्थापन या बाबींमध्ये महाराष्ट्र व देशांमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे यामध्ये सिंचनासाठी शेततळे खोदणे तसेच उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी ठिबक सिंचन , तुषार सिंचन इत्यादी सिंचन पद्धतीचा व आच्छादनाचा वापर करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमपणे वापर केला जात आहे यापूर्वी पिकाला पाणी देताना मोकाट पद्धतीने पाणी दिले जात होते यामुळे पिकांना गरजेपेक्षा जास्त पाणी देऊन जमिनीचे आरोग्य बिघडले जात होते तणांचा व किड रोगांचे प्रमाण जास्त असायचे  जमिनीत क्षारपड होत होत्या व पाण्याची टंचाई जाणवत होती ते प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.




पिकांचे सुधारित व संकरित वाण - 

गेल्या दशकामध्ये अन्नधान्य ,तृणधान्य, गळीत धान्य,फळ पिके , भाजीपाला पिके, फुल पिके इत्यादी विविध पिकांच्या सुधारित संकरित जाती विकसित झालेल्या आहे. सध्या विकसित केल्या जात असणाऱ्या जातीमध्ये फक्त अधिक उत्पादन देणे हेच ध्येय नसून ती जात प्रतिकूल वातावरणाला तग धरू शकणारी किडी रोगाला प्रतिकार करणारी तसेच त्या जातीमध्ये अधिक पौष्टिकता असेल तरच वाण प्रसारित करायला परवानगी दिली जात आहे त्यामुहे  असे संशोधन सध्या  राज्य व देश पातळीवर सुरू आहे व विविध पिकातील काही जाती शेतकऱ्यांना उत्पादनासाठी वितरित केलेले आहेत.


शाश्वत शेती पद्धती- 

शेतीमधून मिळणाऱ्या पीक उत्पादनामध्ये सातत्यत्या रहावी यासाठी शेतीमध्ये एकात्मिक अन्नद्रव्यवस्थापन , एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन ,सेंद्रिय शेती ,नैसर्गिक शेती , जैविक  शेती ,एस आर आय ,एस आर टी ,कमी मशागत शेती ,शून्य मशागत शेती इत्यादी बाबींचा अवलंब केला जात आहे.


कृषि यांत्रिकीकरण- 

कमी वेळेत जलदगतीने व प्रमाणबध्द मशागतीची कामे ,  पेरणी लागवड आंतरमशागतीची कामे फवारणी काढणे काढणी प्रक्रिया व पॅकिंग इत्यादी कामांसाठी  यंत्र व औजारांचा वापर मोठयामाणावर केला जात आहे यामुळे कामे वेळेत होण्याबरोबरच उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत आहे व मजुर टंचाई या शेतक-याच्या समस्येवर एक प्रभावी तोडगा निघाला आहे. यांत्रिकीकरणासाठी कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना कृषि यांत्रिकीकरण योजना उकात्मिक फलोत्पादन योजना उपअभियान अशा विविध योजनांमधुन अनुदान मिळत असल्यामुळे यांत्रिकीकरणाकडे शेतक-यांचा कल वाढत आहे.




विविध शासकीय योजना व धोरणांचे शेतकऱ्यांना पाठबळ - 

शेतकऱ्यांना शेतीमधून उत्पादन घेताना महाराष्ट्र शासन कृषि विभाग , केंद्र व राज्य शासनाकडून मिळणा-या अनुदातुन  विविध योजनांमधून शेतक-यांना अनुदान दिले जात आहे त्यापैकी प्रमुख योजना पुढील प्रमाणे फळबाग लागवडीसाठी लहान शेतक-यांसाठी महात्मा गांधी फळबांग लागवड योजना तसेच पाच एकरांवरील  मोठ्या शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, कृषी यांत्रिकीकरण , पीएमएफ एम ई अंतर्गत प्रक्रियेसाठी अनुदान केंद्र सरकार मार्फत,  पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये तर महाराष्ट्र सरकार तर्फे नमो शेतकरी सन्मानमार्फत 6000 रुपये शेतकऱ्याच्या थेट अकाउंट मध्ये जमा केले जात आहेत. 





याबरोबरच एक रुपयांमध्ये पिक विमा योजना , हवामान आधारित फळपिक विमा योजना,  विविध पिकांसाठी किमान आधारभूत किंमत , कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प , प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत  शेततळ्यासाठी अनुदान , उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेतीसाठी ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊस तसेच अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत रोपवाटिकेसाठी अनुदान ,शेतकरी शेतीशाळा व शेतकरी प्रशिक्षणासाठी तरतूद  व दुर्दैवाने शेतकऱ्याचा किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान त्यांच्या वारसाला दोन लाख रूपये सानुग्रह अनुदान दिले जात आहे.


काढणीपश्चात प्रक्रिया साठवणूक व विक्री - 

यामध्ये काढणी झाल्यानंतर किंवा हंगाम संपल्यानंतर बाजारामध्ये एकाच वेळेला जास्त ‘शेतमाल उत्पादन आल्यास उत्पादित शेतीमालाला कमी बाजारभाव मिळतो हे टाळण्यासाठी शासनाने प्रक्रिया व साठवणूक करून नंतर टप्प्याटप्प्याने उत्पादित माल बाजारात आणावा यासाठी शेतकऱ्यांना उत्पादक कंपनीच्या मार्फत गोडाऊनची सुविधा ,प्रक्रिया उद्योगासाठी अर्थसहाय्य ,पॅक हाऊस रायपनिंग चेंबर ,कांदा चाळ ,कोल्ड स्टोरेज इत्यादी गोष्टीसाठी अनुदान दिले जात आहे तसेच विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मेसेज द्वारे बाजारभावाची व बाजारात आवक झालेल्या मालाची माहिती दिली जात आहे



हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर -


सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस पर्जन्यमान, तापमान यामध्ये खूप मोठा बदल घडत आहे व या बदलामुळे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान उदाहरणार्थ गादीवाफयावर पिकांची पेरणी किंवा लागवड ठिबक व तुषार सिंचन चा वापर पिकांसाठी मल्चिंग व क्रॉप कव्हर, प्रतिकूल वातावरणात तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती हवामानाचा अंदाज , हवामान आधारित कृषी सल्ला इत्यादी गोष्टी वापरून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे होणारे संभाव्य नुकसान कमी करता येते किंवा टाळता येते.


अशा प्रकारचे विविध सकारात्मक बदल कृषी क्षेत्रात झाल्यामुळे शेतीमधील उत्पादन वाढ झालेले आहे तसेच देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे एवढेच नव्हे तर बऱ्याच भाजीपाला ,फळे, मसाला पिके व प्रक्रियायुक्त पदार्थ यांचा सर्वात मोठा निर्यातदार देश झालेला आहे.