०१ जुलै २०२४

हरितक्रांतीचे शिल्पकार : वसंतराव नाईक

ब्लॉगर पोस्ट कॉपी प्रतिबंध

 


श्री.अनंत देशमुख , कृषी पर्यवेक्षक 

अकोट जि. अकोला

राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांचा जन्म एक जुलै 1913 रोजी झाला. 1963 ते 1975 या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते. याच काळात आपल्या राज्यात दुष्काळाचे सावट होते. मुख्यमंत्री झाल्यापासूनच त्यांनी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी योगदान दिले.

          आधुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरद पवार यांनी घोषित केला. तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषी दिन साजरा होत आहे. 

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतीवर निस्सिम भक्ती असणारे नेते वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे की "मी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर देहाने जरी असलो तरी माझे चित्त मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर असते.' हा विचार लक्षात घेता शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व शेतकऱ्यांना आत्मबळ देण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत श्री एकनाथराव पवार यांनी कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव संकल्पना रुजवली. 2011 पासून कृषी दिन हा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करण्याची प्रथा रूढ झाली. इतर राज्यात देखील एक जुलैला कृषी दिन साजरा होताना दिसून येतो.

          कृषी दिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिन हा नैसर्गिक रित्या पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावन पर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनेचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखले जातात. भूमीहिनाना लाखो एकर जमीन त्यांनी वाटप केली. शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलविण्याचे  तसेच कृषी संस्कृतीला नव संजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केले. शिवाय पहिल्यांदाच चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली. 1972 सारख्या भीषण दुष्काळातही महानायक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी शेतकरी आत्महत्या शब्द देखील गवसला नव्हता. शेतकऱ्यांवर त्यांचे  जिवापाड प्रेम होते.

 शेती आणि मातीवरील त्यांची निश्‍चिम भक्ती ही भारतीय कृषी संस्कृतीच्या इतिहासात एक प्रेरणा म्हणून ओळखली जाते. शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांचे लेकरं सुद्धा कलेक्टर झाली पाहिजेत हे महानायक वसंतराव नाईक यांच्या स्वप्न होते. थेट बांधावर आधुनिक कृषी तंत्र व दूरगामी उपाय योजनांची अंमलबजावणी याबरोबरच नव्या पिढीत शेती, शेतकऱ्यांप्रती जिव्हाळा निर्माण केल्यास नाईक साहेबांची स्वप्न पूर्णत्वास येऊ शकते. भारतीय कृषी संस्कृतीला उजाळा देणाऱ्या कृषी दिन या पावन पर्वाचे जनमानसात अनन्यसाधारण असे महत्त्व असून शासकीय कार्यालय, गाव,शहरात अनेक ठिकाणी त्यांची जयंती साजरी केली जाते.

     कृषी विभाग दरवर्षी एक जुलैला महानायक वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करत असतो. या दिवशी गाव पातळीवर, तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.  त्या परिसरातील प्रगतिशील तसेच पुरस्कार प्राप्त शेतकरी  यांचा सन्मान केल्या जातो आणि त्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा