०७ जून २०२४

पिकांची बेडवर लागवड: फायदे आणि तंत्रज्ञान




हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतीपद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे झाले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत नवनवीन हवामान अनुकूल शेतीपद्धती व तंत्रज्ञानावर भर देण्यात येत असून कृषी हवामान विभागानुसार तंत्रज्ञान अवलंबाबाबत शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यात येत आहे. यामध्ये बीबीएफ तंत्र आणि शुन्य मशागत पद्धती हवामान अनुकूल असल्याने पिकांचे उत्पादन वाढीसाठी फायदेशीर असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही पद्धतीमध्ये "रुंद वाफ्यावर (बेडवर) पिकांची लागवड" हे तंत्र समान असून त्याचा अवलंब वाढविणे गरजेचे आहे. 


जमिनीची रचना, जमीनधारणा आणि पावसातील लहरीपणा लक्षात घेऊन सपाट जमिनीवरील लागवडीपेक्षा गादीवाफ्यावरील लागवड अधिक हवामान अनुकूल असल्याचे दिसून आले आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय कोरडवाहू संशोधन केंद्र हैदराबाद आणि राज्यातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी रुंद वाफ्यावर तसेच वरंब्यावर पिकांच्या लागवडीच्या शिफारशी केलेल्या आहेत.

शेतातून अतिरिक्त पाणी काढून टाका! ड्रेनेज सिस्टम (निचरा प्रणाली) बद्दल सर्वकाही

अ. रुंद वाफ्यावर लागवड करण्याचे फायदे


१. जास्त पावसाच्या कालखंडात अतिरिक्त पाणी सरीमध्ये अडवून मुलस्थानी जलसंवर्धन होते तसेच पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतो.


२. कमी पावसाच्या कालखंडात किंवा पावसाचा खंड पडल्यास सरीतील उपलब्ध ओलावा पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो.


३. एकरी रोपांची संख्या नियंत्रित राखता येते त्यामुळे बियाण्याची बचत होते.


४. मातीचे तापमान नियंत्रित राहते.

५. मातीमध्ये सच्छिद्रता निर्माण होऊन पिकाच्या मुळाशी हवा आणि पाणी यांचे प्रमाण योग्य राहते.


६. बाष्पीभवन कमी होऊन ओलावा टिकून राहिल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होतो.


७. पावसाचे पाणी भूगर्भात झिरपण्याचे प्रमाण वाढते.


८. आंतरमशागतीची कामे करणे सोयीचे होते.


९. जमिनी भेगाळण्याचे प्रमाण कमी होते


१०. जमिनीची धूप कमी होते.


ब. रुंद वाफा (बेड) तयार करण्याची पद्धतः


कृषी विद्यापीठाने रुंद वाफा व सरी (बीबीएफ) तंत्रामध्ये बेडवर लागवड करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार विविध पिकांसाठी बेडचा आकार, ओळींची व रोपांची संख्या तसेच बियाण्याचे प्रमाण याबाबत खालीलप्रमाणे तंत्रज्ञान अवलंब करण्यात यावे.


१. सोयाबीन पिकासाठी १२० सेंमी अंतराचा रुंद वाफा तयार करावा. वाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करावी. प्रत्येक वाफ्यावर ३० सेंमी अंतरावर सोयाबीन पिकाच्या ३ ओळी घ्याव्यात. दोन रोपातील अंतर जमिनीच्या मगदुरानुसार ५ ते ८ सेंमी ठेवावे. उपलब्ध टोकण यंत्रानुसार रोपातील अंतरामध्ये बदल करण्यात यावा.


२. सोयाबीन पिकासाठी १५० सेंमी अंतराचा रुंद वाफा तयार करावा. वाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करावी. प्रत्येक वाफ्यावर ३० सेंमी अंतरावर सोयाबीन पिकाच्या ४ ओळी घ्याव्यात. दोन रोपातील अंतर जमिनीच्या मगदुरानुसार ५ ते ८ सेंमी ठेवावे. उपलब्ध टोकण यंत्रानुसार रोपातील अंतरामध्ये बदल करण्यात यावा.


३. कापूस पिकासाठी १२० सेंमी अंतराचा रुंद वाफा तयार करावा. वाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करावी. प्रत्येक वाफ्यावर मध्यभागी एक ओळ घ्यावी. दोन रोपातील अंतर ४५ सेंमी ठेवावे.


४. कापूस पिकासाठी १५० सेंमी अंतराचा रुंद वाफा तयार करावा. वाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करावी. प्रत्येक वाफ्यावर कापूस पिकाच्या २ ओळी घ्याव्यात. दोन ओळीतील अंतर १२० सेंमी ठेवावे व दोन रोपातील अंतर ४५ सेंमी ठेवावे. या पद्धतीमध्ये १२०-६०-१२० सेंमी प्रमाणे जोडओळ पद्धतीने लागवड होईल.


५. मका पिकासाठी १२० सेंमी अंतराचा रुंद वाफा तयार करावा. वाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करावी. प्रत्येक वाफ्यावर ६० सेंमी अंतरावर मका पिकाच्या २ ओळी घ्याव्यात. दोन रोपातील अंतर २० सेंमी ठेवावे.


६. मका पिकासाठी १५० सेंमी अंतराचा रुंद वाफा तयार करावा. वाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करावी. प्रत्येक वाफ्यावर ६० सेंमी अंतरावर मका पिकाच्या २ ओळी घ्याव्यात. दोन रोपातील अंतर २० सेंमी ठेवावे.


७. सोयाबीन पिकाप्रमाणे रबी हंगामात हरभरा पिकाची बेडवर टोकण करावी.


८. सध्या बाजारात मनुष्यचलित टोकण यंत्र उपलब्ध असून त्याची उपयुक्तता चांगली असल्याचे दिसून आले आहे.

९. याचप्रमाणे ज्वारी, गहू, बाजरी इ. पिकांची रुंद वाफ्यावर लागवड करणे शक्य आहे. सुलभ संदर्भासाठी सोबत पिकनिहाय रुंद वाफे पद्धतीचा आराखडा जोडण्यात आला आहे.


क. पाण्याचे व्यवस्थापनः


पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी तुषार किंवा ठिबक सिंचन पद्धतीने दिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर बरोबरच उत्पादन वाढ २५-३०% होईल. खरीप, रबी किंवा उन्हाळी हंगामात पिके घेण्यासाठी सिंचनाची सोय आवश्यक आहे. सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास रुंद वाफा (बेड) वर पिकाची लागवड केल्यानंतर पाणी देण्याच्या खालील पद्धती आहेत.


१. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणेः


खरीप हंगामातील कापूस पिकासारख्या जास्त कालावधीच्या पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. तसेच सोयाबीन, मका, ज्वारी, हरभरा, गहू इ. पिकांना सुद्धा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे शक्य आहे. कापूस, मका, ज्वारी या पिकामध्ये एका बेडवर एक ठिबकची नळी वापरावी. तसेच सोयाबीन, हरभरा, गहू या पिकांसाठी एका बेडवर १/२ ठिबकच्या नळ्या वापरावेत.


२ . तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणेः


कापूस पिकाकरीता तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे शक्य होत नाही. सोयाबीन, मका, ज्वारी, हरभरा, गहू इ. पिकांना तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे शक्य आहे. त्यामुळे खरीप व रबी हंगामात पिकांना गरज असल्यास तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.


३. पाटाने/मोकळे पाणी देणेः


ज्या शेतकऱ्यांच्याकडे ठिबक किंवा तुषार सिंचन उपलब्ध नाही त्या शेतकऱ्यांनी रुंद वाफा (बेड) वर लागवड केलेल्या पिकांना पाटाने / मोकळे पाणी द्यावे. यासाठी दोन बेड मधील सरींमधून पाणी द्यावे. सरीमधून पाणी दिल्यानंतर पूर्ण बेड भिजत नसल्यामुळे पीक लागवड पद्धतीमध्ये बदल करावा लागेल. यासाठी १.२ मीटर आकाराचा बेड तयार करावा. बेडवर पिकाची लागवड करताना दोन ओळीमधील अंतर वाढवून बेडच्या कडेला लागवड करावी. त्यामुळे सरीमधून पाटाने /मोकळे पाणी दिल्यानंतर पिकाच्या मुळापर्यंत पाणी पोहोचणे शक्य होईल.


रुंद वाफे पद्धतीचा आराखडा

१. सोयाबीन (वाफ्याची रुंदी १२० सेमी / १.२० मीटर )


२. सोयाबीन (वाफ्याची रुंदी १५० सेमी / १.५० मीटर )


३. कापूस  (वाफ्याची रुंदी १२० सेमी / १.२० मीटर )




४.कापूस  (वाफ्याची रुंदी १५० सेमी / १.५० मीटर )





५. मका  (वाफ्याची रुंदी १२० सेमी / १.२० मीटर )



६. मका  (वाफ्याची रुंदी १५० सेमी / १.५० मीटर )








४ टिप्पण्या: