१५ जून २०२४

कीड व्यवस्थापनासाठी.... चला निंबोळी गोळा करूया !




डॉ. एन. के. भुते, डॉ डी. बी. कच्छवे, 

  रासायनिक कीडनाशकांच्या अवाजवी आणि अविवेकी वापरामुळे सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होत आहे. फळे, भाजीपाला, अन्नधान्य व जनावरांच्या दुधातून व मांसातून कीटकनाशकांचे अंश मानवी शरीरात प्रवेश करीत आहे. एवढेच नाही तर आईच्या दूधातून हे कीटकनाशकांचे अंश जणू बाळकडू म्हणून जन्मताच बालकांच्या शरीरात प्रवेश करतात यामुळे मतीमंदता, अपंगत्व यासारखे गुंतागुंतीचे अनेक व्यंग आणि रोग मानवी शरीरात आढळून येत आहेत. त्यासोबतच कीटकनाशकांमुळे मित्रकिडी, माळढोक सारख्या पक्षांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. 

अश्या बिकट समयी सावधान होऊन शेतकरी बांधवांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास सजीव सृष्टीची संभाव्य हानी टाळता येईल. याकरिता एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या इतर घटकांसोबत जैविक व वनस्पतीजन्य कीटकनाशकाची उपलब्धता व वापर वाढविणे आवश्यक आहे. या विषयाची जाण असून सुद्धा अनेक वेळा ही जैविक व वनस्पतीजन्य कीटकनाशके उपलब्ध होत नाही आणि पर्यायाने शेतकरी बांधव रासायनिक कीटकनाशकांकडे वळतात. यावर रामबाण उपाय म्हणून कडूनिंबाच्या निंबोळ्यांपासून उत्तम दर्जाचे कीटकनाशक घरच्या घरी तयार करता येते.



 कडूनिंबाचे पारंपरिक महत्त्व:- 


कडूनिंबाचे भारतीय संस्कृती मध्ये महत्वाचे स्थान आहे 
1) कडूनिंब हे एक औषधी वनस्पती व कल्पवृक्ष म्हणून गणल्या जाते गूढीपाडव्याच्या दिवशी कडू निंबाची पाने खाण्याची प्रथा आहे. आपल्या पोटातील घातक कृमीचा नाश व्हावा हा त्यामागिल उद्देश आहे.

2) तामिळनाडू राज्यातील भाविक तेथील देवी देवतांना कडूनिंबाची पाने व फुले यांची माला अर्पण करतात तसेच कडूनिंबाच्या फुलाचा भाजी म्हणून उपयोग करतात

3) कडूलिंबाच्या लाकडाला वाळवी लागत नाही म्हणून हे अत्यंत मौल्यवान आहे, इमारती लाकूड, नक्षी काम कोरण्यासाठी, शेतीची अवजारे बनविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. 

4) उन्हाळ्यात हे झाड हिरवेगार असल्यामुळे दाट छाया व पर्ण उत्सर्जनामुळे थंडावा देते, शेताच्या सभोवती झाडे लावल्यामुळे उष्ण वारे अडतात व जमिनीतून होणारे उत्सर्जन थांबते. 

5) कडूनिंबाची वाळलेली पाने धान्य साठविण्यास उपयोगी पडतात तसेच रेशमी कपडे व इतर कपडे साठविण्यासाथी कडूनिंबाची वाळलेली पाने वापरतात 

 कडूनिंब हे आपल्या भारत देशाला निसर्गाने दिलेले जणू एक वरदान आहे: प्रत्येक शेतकर्‍यांच्या शेतावर किमान ४-५ कडूनिंबाचे वृक्ष असतात. पण आपल्याकडे कडू निंबाची विपुलता असून सुद्धा अज्ञानामुळे किंवा आळसामुळे निंबोळीचा पाहिजे त्या प्रमाणामद्धे वापर होत नाही पर्यायाने शेतकरी बाजारातील महागड्या रेडिमेड किटकनाशकाकडे वळतात. सर्व शेतकरी बांधवांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनासोबत या कडू निंबोळीचा वापर केल्यास कदाचित रासायनिक कीटकनाशकाचा वापर शून्यावर आणून उत्पादन खर्च कमी करता येतो व पर्यावरणाचे/ निसर्गाचे संतुलन राखता येते.

  कडूनिंबाला मे ते जुन महिन्या दरम्यान निंबोळ्या लागतात या निंबोळ्या पकक्व झाल्या नंतर जमिनीवर पडतात या पडलेल्या निंबोळ्या गोळा करून वाळवून साठवून ठेवल्यास त्यापासून घरच्या घरी स्वस्त दरात उत्तम दर्जाचे वनस्पतिजन्य कीटकनाशक बनवता येते. शेतकरी बांधवांनी वेळीच जागरूक होऊन निंबोळी अर्काचा वापर वाढवावा निंबोळ्याच्या बियांमधून निंबोळी तेल मिळतेच यामध्ये अॅझाडिराक्टीन नावाचे रसायन असते या अॅझाडिराक्टीनमध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म असल्यामुळे किडींच्या व्यवस्थापनाठी वापर होतो. निंबोळी अर्क हा मानवी आरोग्यास अपायकरक नाही त्यामुळे निंबोळीची मागणी आज दिवसेनदिवस वाढत आहे म्हणून जुन महिन्यात झाडाखाली पडलेल्या निंबोळ्या गोळा केल्यास त्या पासून कीटक नाशक तयार करता येते व ग्रामीण युवकांना त्यापासून स्वयंरोजगार निर्माण होऊ शकतो आणि आपल्या देशाला निसर्गाने कडुंनिंबाच्या रूपाने दिलेल्या देनगिचा पुरेपूर वापर करता येवू शकतो.

निंबोळी अर्कासाठी निंबोळया गोळा करण्याची व साठवण्याची शास्त्रीय पद्धत:


1) फक्त पिकलेल्या निंबोळया गोळा कराव्या, निंबोळया गोळा करतांना जमिनीवर कापड अंथरावे
2) गोळा केलेल्या निंबोळ्याचे आवरण व गर स्वच्छ पाण्यामध्ये चोळून धुवून त्वरित काढावा.
3) गर काढलेल्या निंबोळी बिया सावलीत एकेरी थरामध्ये वाळवाव्यात.
4) बियांची साठवण सचिद्र कापडी अथवा ज्यूट पोते, बांबू टोपले, गोणपाठ यात करावी.
5) निंबोळी बियांची साठवण थंड व कोरड्या जागेत करावी.
6) साठवलेल्या निंबोळी बिया अर्क तयार करण्यासाठी वापरावा आणि बनविलेला अर्क शेतीतपीक संरक्षणासाठी वापरावा.
7) कच्या जमिनीवर पडलेल्या शिळ्या निंबोळया गोळा करू नये
8) निंबोळया प्रखर उन्हामध्ये वाळवू नये. 
9) निंबोळया बियांची प्लास्टिकच्या किंवा सिमेंटच्या पोत्यामध्ये साठवण करू नये.


निंबोळी पावडर एक लघूउद्योग :

 प्रत्येक गावामध्ये युवकांनी किंवा बचत गटाच्या महिलांनी एकत्र येवून निंबोळी पावडर व निंबोळी अर्क लघूउद्योग सुरू केल्यास आणि उन्हाळयात पक्व झालेल्या निंबोळया गावातील महिला व युवकांमार्फत काही ठराविक दराने गोळा करून घेतल्यास अनेकांसाठी एक उत्तम स्वयंरोजगार गावात सुरू होवू शकतो. निंबोळी पावडर व निमार्क शेतकर्‍याना उपलब्ध करून दिल्यास गावातील रासायनिक कीटकनाशकाचा वापर हळूहळू कमी करून संपूर्ण गाव कीटकनाशकाच्या बाबतीत स्वावलंबी करता येवू शकते व कीटकनाशकांच्या माध्यमातून शेतकर्‍यांची होणारी आर्थिक लूट व पर्यावरणाची होणारि हानी थांबवता येते.  


निंबोळीतिल अॅझाडिराक्टीनचे कीड़ीवर होणारे परिणाम/निंबोळी अर्काचे गुणधर्म:


1) परावृत्तक (Repellent) : अॅझाडिरक्टिनची फवारणी केल्यास त्याच्या वासाने किड वनस्पतिजवळ न येता दूर जाते. त्यामुळे पिकांचे होणारे नुकसान टळते.

2) भक्षण रोधक (Antifeedent) : पीक अगर वनस्पतीवर अॅझाडिराक्टीनच्या फवारणीमुळे खाद्य कडू होऊन किडीचे खाणे बंद होते व पिकांचे होणारे नुकसान टळते 

3) अंडी घालण्यात व्यत्यय : अॅझाडिराक्टीनची फवारणी केल्याने त्याच्या वासामुळे पिकांपासून कीटकांच्या माद्या एक तर दूर पळतात किंवा अंडी घालत नाहीत. त्यामुळे त्या पिकावर किडीची वाढ होत नाही किंवा किडींची संख्या अत्यल्प राहून पिकांचे नुकसान टळते.


4) प्रजोत्पादनात व्यत्यय: (Sterilent) किडीमद्धे नपुंसकता येते. नरमादीचे लिंगाक निर्माण कमी होते. त्यामुळे मीलन न होता किडी मरतात व पुढील प्रादुर्भाव कमी होतो. मीलन झाल्यास अंडी घालण्याची क्षमता कमी होते. काही प्रमाणात टाकलेल्या अंडीमध्ये उबण्याचे प्रमाण कमी होते. 

5) कात टाकण्यावर परिणाम: किडीच्या नियमित वाढीसाठी अळी अगर पिल्लांना ठराविक वेळी कात टाकणे महत्वाचे असते. त्याशिवाय कीडीची वाढ होत नाही. अॅझाडिराक्टीनमुळे कात टाकण्याची प्रक्रिया खंडित होऊन किडी मरतात.

6) किडीच्या वाढीवर परिणाम: किडींची नियमित वाढ न होता अपंगत्व अगर विकृत वाढ होते. त्यामुळे खाणे कमी अगर बंद होऊन किडी मरतात. 

7) उडण्याची क्षमता कमी होणे: अॅझाडिराक्टीनमुळे कोषातुन निघालेले प्रौढ अपंग अथवा विकृत निर्माण होतात. पंखांची वाढ होत नाही. त्यामुळे त्यांची उड्डाण क्षमता कमी होऊन पुढील प्रादुर्भाव व प्रजोत्पादन कमी होते

8) आयुष्य कमी होणे: अॅझाडिराक्टीनचा किडीवर होणार्‍या या सर्व विपरीत परिणामामुळे त्यांचे निर्धारित आयुष्य कमी होऊन पिकांचे नुकसान कमी होते.


इतर पर्यावरणमित्र फायदे:


1. अॅझाडिराक्टीनची फवारणी पर्यावरणनिष्ठ व पर्यावरणमित्र उपचार आहे. त्यामुळे मित्रकीटकांना हानिकारक नाही. त्यांचे रक्षण होण्यास मदत होते.
2. खाद्य पदार्थात विषारी घटक येत नाहीत.
3. पिकांमध्ये मित्रकीटक सोडल्यावर सुद्दा निंबोळी अर्काची फवारणी करता येते.
4. नैसर्गिक सामग्री असल्यामुळे पर्यावरण संतुलन राखल्या जाते.
5. मनुष्य अगर इतर प्राण्यांना विषबाधा होत नाही.

 कीटकनाशकीय गुणधर्म, पर्यावरननिष्ठ व पर्यावरण मित्र या गुणधर्मामुळे अॅझाडिराक्टीन हे एकात्मिक कीड व्यवस्थापनातील एक महत्वाचा घटक झालेला आहे. 


अॅझाडिराक्टीनची प्रारूपे:


 कडुनिंबातील अॅझाडिराक्टीन हे वेगवेगळ्या प्रारूपात कीड व्यवस्थापनात वापरता येतात. 300 पेक्षा जास्त पिकांवरील किडी आणि साठवणूकितील किडीसाठी याचा वापर करता येतो. बाजारात वेगवेगळ्या प्रारूपात निमयुक्त कीटकनाशके (अॅझाडिराक्टीन 300 ते 3000 पी पी एम) उपलब्ध आहेत. परंतु ही प्रारूपे घरगुती निंबोळी अर्कापेक्षा थोडी महाग येतात. अॅझाडिराक्टीनची प्रारूपे खालीलप्रमाणे आहेत.

१. नीम अर्क : पाने, बिया, दाणे, साल, इत्यादि पासून पाण्यातील अर्क तयार करून त्याचा वापर करतात, विशेषत: निंबोळीच्या 5% अर्काची शिफारस आहे.   

२. निंबोळी तेल : तेलात 0.15% अॅझाडिराक्टीन, 1.4% सालानिन, 0.5% असिटील निंबीन, 0.15% इपोक्झी अॅझाडिराक्टीन ही घटके असतात. साधारणत: 1.0 ते 2.0 % तेलाच्या फवारणीची शिफारस आहे. तेलाचा पातळ थर कीडीच्या श्वसन छिद्रांवर तयार होऊन, श्वसन क्रियेत अडथळा येवून किडी मरतात. 

३. नींबोळी पावडर : कडुनिंबाची पाने किंवा निंबोळया वाळवून त्यांची पावडर करून ती 1 ते 2% या प्रमाणात धान्य साठवणुकीसाठी वापरतात, तसेच निंबोळीच्या दाण्यापासून तयार केलेली भुकटी पाण्यात मिसळून त्याची फवारणी करतात. 

४. दाणेदार खतावर आवरण : दाणेदार युरियातील अमोनियाचे विघटन टाळण्यासाठी त्यावर निंबोळी अर्काचे आवरण देतात. त्यामुळे जमिनीत युरिया टाकल्यावर जमिनीतील किडींचे काही प्रमाणात व्यवस्थापन करण्यास मदत होते.

निंबोळीचे उपयोग: अॅझाडिराक्टीनच्या या प्रारूपांपैकी निंबोळीच्या 5% अर्काची व त्या खालोखाल निंबोळीच्या तेलाची पीक संरक्षनासाठी शीफारसी आहेत.

1. निंबोळीच्या 5% अर्काची फवारणी कपाशीवरील बोंड अळी, तुरीवरील शेंगअळी व हरभ-यावरील घाटेअळीसाठी उपयोगी आहे.

2. या 5% अर्कासोबत कीटकनाशकाची अर्धी मात्रा वापरल्यास कीडींचे प्रभावी नियंत्रन होते.

3. घाटेअळी विषाणू सोबत हा अर्क वापरता येतो.

4. निंबोळीचे तेल 1.0 % + मोनोक्रोटोफोस 0.025 %ची पहिली फवारणी व फक्त निंबोळीच्या 1.25% तेलाची दुसरी फवारणी संत्र्यावरील काळ्यामाशीच्या पिल्लावस्थेत करता येते. तेल पाण्यात मिसळण्यासाठी तेलाच्या 10% प्रमाणात डिटर्जंट पाउडर मिसळावे.

5. निंबोळी तेलाची (1.0 %) फवारणी केल्यास फळातील रस शोषणारा पतंग व पाने खाणार्‍या अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.

6. निंबोळीच्या 5% अर्कामुळे संत्र्यावरील पाने पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. 

 बाजारात उपलब्ध असलेल्या निमयुक्त कीटकनाशकाप्रमाणेच शेतकर्‍यांनी स्वतः तयार केलेला. निंबोळीचा 5% अर्कसुद्धा तितकाच प्रभावी असून स्वस्त आहे. म्हणून निंबोळीचा 5 % अर्क तयार करण्याची पद्धत येथे प्रस्तुत आहे.


निंबोळीचा 5 टक्के अर्क तयार करण्याची पद्धत :

1. उन्हाळ्यात (पावसाळ्याच्या सुरूवातीस) निंबोळया गोळा करून चांगल्या वाळवून व साठवून ठेवाव्यात 
2. फवारनीच्या आदल्या दिवशी आवश्यकतेप्रमाणे निंबोळया कुटून बारीक कराव्यात.
3. आदल्या दिवशी 5 किलो निंबोळी चुरा 9 लिटर पाण्यात पाण्यात रात्रभर भिजत ठेवावा. तसेच 1 लिटर पाण्यात 200 ग्रॅम साबनाचा चुरा वेगळा भिजत टाकावा.
4. दुसर्‍या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क पातळ फडक्यातून गाळून घ्यावा. या अर्कात 1 लिटर पाण्यात तयार केलेल्या साबणाचे द्रावण मिसळावे.
5. हा अर्क एकूण 10 लिटर होईल इतके पाणी टाकावे. अशा प्रकारे 5% निमार्क तयार होतो.
6. वरीलप्रमाणे तयार झालेला 1 लिटर निंबोळीचा अर्क 9 लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी वापरावा.
7. चांगल्या परिणामकारक फवारणीसाठी आदल्या दिवशी तयार केलेला अर्कच वापरावा.

२ टिप्पण्या: