१९ जून २०२४

जमिन सुपिकता जागृती दिन

 



पूर्वीची शेती ही फक्त सेंद्रिय खतावर असायची त्यामुळे त्याच्यातून उत्पादनही भरपूर मिळत असे. शेतीतून सोन पिकवल जाते असे,अशी जुन्या लोकांची मत आहे. फक्त शेतकरीच हा जमिनीला तिचे माता मानतो. कारण त्याला माहित आहे जर आपण शेतीमध्ये जमिनीमध्ये व्यवस्थित सुपीकता ठेवली तर आपल्याला जमिनीतून भरपूर उत्पन्न मिळेल. परंतु सध्याची परिस्थिती वेगळीच झाली आहे. 

वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नाची गरज भागविण्यासाठी पाणी व रासायनिक खतांचा भरमसाट वापर होत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्‍यात येत असून, जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत वापराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. भारतात तर जगाच्या तुलनेत एकरी उत्पादकता फारच कमी आहे. दिवसेंदिवस पीक उत्पादनात घट होत आहे. त्याला कारण म्हणजे जमिनीची कमी होत जाणारी सुपीकता.


जमिनीची सुपीकता म्हणजे पिकांना किंवा वनस्पतींना आवश्यक असणारे अन्नद्रव्य पुरविण्याची क्षमता म्हणजे जमिनीचे सुपीकता.

माती परिक्षणाव्दारे जमिनीची सुपीकता ओळखली जाते. एकंदरीतच महाराष्ट्र राज्याचा सुपीकतास्तर नत्राच्या बाबतीत कमी ते मध्यम, स्फुरदामध्ये कमी ते अत्यंत कमी आणि पालाशमध्ये भरपूर ते अत्यंत भरपूर आहे. 


जमिनीच्या शाश्वत आरोग्य व्यवस्थापनासाठी

सुपीकता निर्देशांक कमी होण्याची कारणे


1) जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे.

2) जमिनीतील सामु मध्यम ते जास्त विम्लतेकडे वाढत चालला आहे.

3) असमतोल अन्नद्रव्यांचा वापर

4) अमर्याद सिंचनाचा वापर .

5) रासायनिक खते देण्याची चुकीची पद्धत, वेळ आणि मात्रा.

6) सतत एकच पीक घेत राहणे. पिकांची फेरपालट न करणे.

7) जमिनीचे बिघडत चाललेले भौतिक गुणधर्म आणि कमी होत चाललेली सूक्ष्मजिवाणुची संख्या.

8) भरखते अजिबात न वापरणे, खा­ऱ्या पाण्याचा सतत वापर करणे.

9) जमिनीत चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असणे

10) जमिनीच्या वाढत चाललेल्या अपधावाच्या प्रमाणामुळे १ इंच थर (सुपीक थर) पाण्याबरोबर अन्नद्रव्यांसह वाहून जातो.

11) विहित वेळेत माती परीक्षण न करणे.




भविष्यातील शाश्वत उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापनात खालील गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे


1) पिकांची फेरपालट करून कडधान्य पिकांचा समावेश केल्याने पालापाचोळा जमिनीत पडून सेंद्रिय पदार्थाचे चक्रीकरण होते.

2) माती परिक्षणानुसार खतांचा समतोल वापर अपेक्षित उत्पादन समीकरणाद्वारे केल्यास जमिनीच्या सुपीकतेबरोबर जमीन आरोग्यही चांगले राहील.

3) माती परिक्षणाद्वारे कमतरतेनुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून करावा.

4) माती परीक्षण करून विद्राव्य खतांद्वारे ठिबक सिंचनातून अन्नद्रव्ये पीकवाढीच्या अवस्थेत गरजेनुसार द्यावीत.

5) पाण्याचा अमर्याद वापर न करता, बागायत क्षेत्रामध्ये ठिबक, तुषार,मायक्रोस्प्रिकलर पद्धतीचा वापर वाढवावा.

6) मृद व जलसंधारणाची उपाययोजना लोकसहभागातून कोरडवाहू भागात शासनाच्या मदतीने वाढविणे गरजेचे आहे, कारण पावसाचा प्रत्येक थेंब हा जमिनीत मुरविला गेला पाहिजे.

7) शेततळी तयार करून संरक्षित पाण्याचा उपयोग करावा.

8) बागायत क्षेत्रात दोन ते तीन वर्षातून एकदा तरी हिरवळीची पिके म्हणून धंचा किंवा ताग गाड़ला गेला पाहिजे.

9) क्षारपड जमिनीचे क्षेत्र सुधारविण्यासाठी एकात्मिक पद्धतीने पाणलोट क्षेत्रात जिप्सम शेणखतात मिसळून जमिनीत टाकावे.

10) जास्त पाण्याचा पश्चिम महाराष्ट्रातील हलक्या जमिनीचे क्षेत्र ठिबक सिंचनावर आणून कोरडवाहू फळबाग लागवड करणे गरजेचे आहे.

11) जास्त पाणी कमी क्षेत्रावर देण्याऐवजी कमी पाणी जास्त क्षेत्रावर विभागून दिल्यास जमिनी खराब होणार नाहीत तसेच उत्पादनात वाढ होईल आणि सामाजिक समतोल राखला जाईल.

12) शेतक-यांनी आपल्याकडील असलेल्या जमिनीची 'आरोग्यपत्रिका' तयार करून त्यानुसार जमीन सुधारणा व पीक पद्धतीचे नियोजन करावे.

13) शेतातील उरलेले पीक अवशेष न जाळता त्यांचा आच्छादन म्हणून उपयोग करावा किंवा बारीक तुकडे करून जमिनीत मिसळावे, म्हणजे संख्या वाढेल.

14) जैविक खतांचा वापर बीजप्रक्रिया किंवा शेणखतात मिसळून अधिक प्रमाणात करावा. (उदा. रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळवणारे जिवाणू, ॲझोस्पिरीलम, ॲसेटोबॅक्टर इ.)

15) सेंद्रिय खताच्या उपलब्धेसाठी शेणखतासाठी खड्डा पद्धत अथवा नाडेप पद्धतीचा अवलंब करावा.


जमिनीची सुपीकता व कोणत्याही पिकांची रोग प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी खालील निविष्ठा आपण घरच्या घरी  बनवाव्या.


1) १ किलो दह्याचे ५ लिटर पाणी टाकून ताक बनवून घ्यावे. (पाणी उकळून गार केलेले वापरावे)


2) २ किलो सप्त धान्याचे पीठ किंवा २ किलो बाजरीचे पीठ किंवा २ किलो तांदुळाचे पीठ टाकावे.


3) वरील मिश्रण लस्सी सारखे करावे व २० लिटरच्या कॅन मध्ये ७ ते ८ दिवस साठवून ठेवावे.


4) ७ ते ८ दिवसानंतर संपूर्ण द्रावणाचे १०० ते २०० लिटर पाणी करून व्यवस्थित गाळून घ्यावे.


5) गाळलेल्या द्रावणात २५ मिली सूक्ष्मजीव फॉर्मुलेषण + २५ ग्रॅम मुळींचा, पानांचा व फळांचा मेडिया (काळी पावडर) २५ मिली सी डी एम एम टाकावे.


        वरील सर्व द्रावण १ एकर क्षेत्रात ठिबक किंवा मोकळ्या पाण्यातून द्यावे.


         सर्व प्रकारच्या स्लरी देण्याच्या पद्धती


*सप्त धान्याच्या पिठाची स्लरी १ तारखेला द्यावी


*बाजरीच्या पिठाची स्लरी ७ तारखेला द्यावी


*सप्त धान्याच्या पिठाची स्लरी १५ तारखेला द्यावी


*तांदुळाच्या पिठाची स्लरी २२ तारखेला द्यावी


*ज्यांच्या बागेत रोगांची अडचण असेल त्यांनी बाजरीच्या पिठाची स्लरी जास्त द्यावी आणि ज्यांच्या बागेत किडींची अडचण असेल त्यांनी तांदुळाच्या पिठाची स्लरी जास्त द्यावी.


*सप्त धान्याची स्लरी जास्त कालावधी (३ ते ६ महिने) साठवून ठेवल्यास कोणत्याही पिकामध्ये उत्कृष्ठ रोग व कीड प्रतिकार क्षमता निर्माण होते.


अशा प्रकारे भविष्यात शेतकरीबंधुनी जमीन आरोग्य व सुपीकता सुधारण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. यामध्ये माती परिक्षणावर आधारित रासायनिक खतांचा वापर, जिवाणू खते, भरखते व हिरवळीच्या खतांचा वापर केल्यास रासायनिक खतांची गरज काही प्रमाणात कमी होऊन अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढेल. पर्यायाने जमीन, हवा, पाणी या नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास होणार नाही.


 डॉ. मेघा नागमोते

जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा अमरावती

1 टिप्पणी: