१२ जून २०२४

जमिनीची सुपीकता कशी वाढवावी: हिरवळीची खते आणि त्याचे फायदे




हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरून वाढवलेली पिके फुलोरा येण्यापूर्वी शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे. हिरवळीच्या खतांचे प्रकार आणि त्यांचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:


हिरवळीच्या खतांचे प्रकार:

1. जागच्या जागी पीक उगवून केलेले हिरवळीचे खत:- यामध्ये ताग/बोरू, धैंचा, मूग, उडीद, गवार, चवळी, बरसीम, लसूणघास अशा द्विदलीय पिकांचा समावेश होतो.

2.हिरव्या कोवळ्या पानांचे खत:- जंगलात वाढणार्‍या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे.


हिरवळीच्या खतांचे फायदे:

- जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढतो.

- मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

- मातीत फायदेशीर सुक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवते.


हिरवळीचे खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पिके/वनस्पती आणि त्यातील नत्राचे प्रमाण 

पिकांची यादी आणि त्यातील नत्राचे प्रमाण:

ताग (भोरू): ०.४६%

चवळी: ०.४२%

गवार: ०.४९%

सुर्यफुल: ०.४५%

हरभरा: ०.५०%

सोयाबीन: ०.७१%

उडीद: ०.४७%

मटकी: ०.३५%

लसून घास: ०.७३%

करंज: २.६१%

अंजन: १.४२%

ऐन: २.०४%

भेंड: २.९०%

गिरिपुष्प: २.७४%

हिरवळीचे खत वापरण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे:

पेरणी: हिरवळीच्या पिकांची पेरणी मे-जून महिन्यात करावी.

बियाणाचे प्रमाण: बियाणाचे प्रमाण दीडपट जास्त वापरावे, जेणेकरून पीक दाट येईल.

नांगरणी आणि गाडणे: पिकांची पर्णीय वाढ झाल्यावर फुलोरा येण्याआधी, म्हणजे पेरणीपासून ६ ते ८ आठवड्यांसाठी ते पीक नांगरून जमिनीत गाडावे.

पाणी देणे: शेतात पाणी द्यावे आणि त्याचे पूर्ण विघटन झाल्यावर पुढील रब्बी पिकाची वेळेवर पेरणी करावी


श्री. अनिल मोरे , कृषि पर्यवेक्षक,पालघर

सहायक कृषि अधिकारी परिवार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा